Lalit Modi, Supreme Court: IPL चे माजी आयुक्त ललित मोदी यांनी न्यायव्यवस्थेविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले. सर्वोच्च न्यायालयानेललित मोदींना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती एमआर शाह आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, ललित मोदी भारतीय कायदा आणि संविधानापेक्षा मोठे नाहीत, त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे.
सुप्रीम कोर्टाने ललित मोदींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आघाडीच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून माफी मागण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाने ललित मोदींना माफी मागण्यापूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी भविष्यात अशी चूक करणार नाही, अशी हमी द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणारी काहीही पोस्ट करणार नाही, असेही त्यांना लिहून द्यायला सांगितले.
ललित मोदींनी हे ट्विट केले होते
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एक दिवसापूर्वी ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मला हे स्पष्ट करायचे आहे की, 'काही एजंट खोटेपणा पसरवून भारत आणि तेथील न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिखाव्या शिवाय ते दुसरे काहीही करू शकत नाहीत. ते लोक फिक्सिंगद्वारे पैशांची मागणी करतात.' दरम्यान, ललित मोदींचे हे ट्विट कोणत्या दृष्टिकोनातून होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.