नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांनी देशातील सध्याच्या आर्थिक मंदीला सुप्रीम कोर्ट जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
वकील इंदिरा जयसिंह यांच्या The Leaflet या वेबसाइटला हरिश साळवे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाला दोषी ठरवले आहे. 2012 मध्ये 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी दूरसंचार ऑपरेटर्ससाठी जारी करण्यात आलेल्या 122 स्पेक्ट्रम लायसन्स रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाने अर्थव्यवस्थेच्या घसरणीला प्रेरित केल्याचे हरिश साळवे यांनी सांगितले आहे.
हरीश साळवे म्हणाले , " 2 जीमधील लायसन्सच्या चुकीच्या वितरणासाठी लोक जबाबदार असल्याचे मी समजू शकतो...ज्या ठिकाणी विदेशी गुंतवणूक करत आहेत, त्याठिकाणी लायसन्स रद्द करा...पाहा, ज्यावेळी एखाद्या विदेशी व्यक्तीने गुंतवणूक केली होती. त्यावेळी हा नियम होता की त्यामध्ये म्हटले होते की एक भारतीय भागीदार असणे आवश्यक आहे. विदेशींना माहीत नव्हते की भारतीय भागीदाराला लायसन्स कसे मिळाले." याचबरोबर, विदेशींनी अरब डॉलरची गुंतवणूक केली आणि सुप्रीम कोर्टाने एक पेनाच्या झटक्याने सर्वांना बाहेर केले. तेव्हापासून अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली, असेही हरीश साळवे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, केंद्रीय महालेखापालांच्या (कॅग) अहवालानंतर 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आला होता. यात 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये 122 लायसन्स रद्द करत याप्रकरणात 11दूरसंचार कंपन्यांच्या बाजूने हरिश साळवे यांनी केलेला युक्तीवाद फेटाळून लावला होता.