नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषित हवेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांवर बंदी अथवा लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.दिल्लीतील विषारी हवेच्या मुद्यावर दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने या सूचना केंद्र सरकारला केल्या. दिल्लीतील हवा इतकी खराब झाली आहे की, आम्हाला आपल्याच घरात मास्क लावावा लागत आहे, असे न्यायालयाने म्हटले. पंजाबच्या शेतातील पीक काढल्यानंतर उरणारी धसकटे जाळल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांत प्रदूषण वाढले आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात केले. त्यावरून न्यायालय आणि सरकारी वकील यांच्यात वाद झाला. प्रदूषणास केवळ शेतांतील धसकटांचे जळणे जबाबदार आहे, असे सिद्ध करण्याचा तुम्ही का प्रयत्न करीत आहात, प्रदूषणाच्या इतर घटकांचे काय, असे न्या. रमना यांनी विचारले. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी तुमच्याकडे आपत्कालिन योजना काय आहे, अशी विचारणा सरकारला केली. मेहता यांनी म्हटले की, प्रदूषणास केवळ शेतकरी जबाबदार आहेत, असे आम्ही म्हटलेले नाही. त्यावेळी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळाले नाही, तर बदल होण्याची शक्यता नाही. हवा विषारी झालेली असतानाही शाळा सुरू असल्यामुळे मुलांना बाहेर पडावे लागत आहे. एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, एकीकडे कोविड, डेंग्यू आणि दुसरीकडे प्रदूषण आहे. आणि मुले अशा हवामानात बाहेर पडत आहेत.दिल्लीत शाळा उद्यापासून आठवडाभर राहणार बंददिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे तेथील शाळा व महाविद्यालये सोमवारपासून आठवडाभर बंद ठेवण्याचा, तसेच बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे, तसेच दिल्लीचे सर्व सरकारी कर्मचारी आठवडाभर घरातून काम करणार आहेत.खासगी कार्यालयांसाठी वेगळा आदेश जारी केला जाईल. प्रदूषणासंदर्भात बोलविलेल्या तातडीच्या बैठकीत केजरीवाल यांनी हे निर्णय घेतले, तसेच दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा प्रस्ताव केजरीवाल सरकार सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहे. शनिवारी दिल्लीतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक ५०० वर नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीत आहे.दिल्ली- एनसीआरच्या ढासळत्या हवामानात सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. शनिवारी दिल्लीची हवा अधिकच विषारी झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलावली.
दिल्लीतील प्रदूषण रोखा, प्रसंगी लॉकडाऊन लावा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 5:51 AM