नवी दिल्ली : काशीतील ज्ञानवापी मशिदीतील 'शिवलिंग' सापडलेल्या भागाच्या संरक्षणासाठी आदेशाची मुदत वाढविण्याची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खंडपीठ स्थापन करण्यास सहमती दर्शविली आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गुरुवारी काही हिंदू भक्तांच्या बाजूने वकील विष्णू शंकर जैन यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि सांगितले की, 'संरक्षण प्रदान करण्याचा आदेश दि. १२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आम्ही उद्या दुपारी ३ वाजता खंडपीठ स्थापन करू.'
दरम्यान, मागील आदेशात सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्यांना मशिदीच्या आत ज्या ठिकाणी 'शिवलिंग' सापडले आहे, ते सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते.
काय आहे दावा.... उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मशिदीच्या भागात 'शिवलिंग' सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांच्या गटाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात हा परिसर सील करण्याचे आदेश दिले होते. पाच महिला याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून, अदृश्य देवतांसमोर दररोज प्रार्थना करण्याची परवानगी मागितली आहे. त्यानंतर वाराणसी न्यायालयाने मशीद परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. तलावाचा वापर नमाजपूर्वी "वजू" विधींसाठी केला जात असे.