मोदी आडनाव प्रकरण : राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 11:40 AM2023-07-18T11:40:12+5:302023-07-18T11:55:10+5:30
राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैला सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेराहुल गांधी यांच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ जुलैला सुनावणी होणार आहे.
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल घेतली होती. यावर गेल्या ७ जुलैला गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना कोणाताही दिलासा दिला नव्हता. तर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली होती.
गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते की, सुरत न्यायालयाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. त्यामुळे राहुल गांधींचा अर्ज फेटाळला जातो. तसेच, राहुल गांधी यांच्यावरील जवळपास १० गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत, असेही गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान, यानंतर गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर आता २१ जुलैला सुनावणी होणार आहे.
Supreme Court agrees to hear on July 21, the plea of Congress leader Rahul Gandhi challenging the Gujarat High Court order which declined to stay his conviction in the criminal defamation case in which he was sentenced to two years in jail by Surat court over 'Modi surname'… pic.twitter.com/nA9rkwGVYf
— ANI (@ANI) July 18, 2023
काय आहे प्रकरण?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात "मोदी हे सर्व चोरांचे आडनाव आहे" असे म्हटल्याबद्दल गुजरातमधील भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या लोकांची बदनामी केल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, 'राहुल गांधी यांनी असे म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.' याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत राहुल गांधी यांना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायलायाने त्यांना जामीन सुद्धा मंजूर केला होता आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी ३० दिवसांची शिक्षा स्थगित केली होती. या निर्णयामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.