नवी दिल्ली- सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करणा-या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर निर्णय घेतला जाणार आहे. न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीमार्फत करायची की नाही, यावर आज निर्णय होणार आहे.काँग्रेस नेते तहसीन पूनावाला, पत्रकार बीएस लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनसहीत इतर पक्षकारांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांवर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचं पीठ सुनावणी करून निकाल देणार आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. आता न्यायालय हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली होती. काय आहे प्रकरण ?नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी रुग्णालयात नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. ते ज्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी. आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये झालेल्या सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्याची सुनावणी करणा-या मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे लोया न्यायाधीश होते.
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 9:45 AM