ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला निधी खर्च करण्याला परवानगी दिल्याने राजकोट येथे भारत आणि इंग्लंडमध्ये होणा-या पहिल्या कसोटी सामन्यावरील अनिश्चिततेचे मळभ दूर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला पहिल्या कसोटीसाठी ५८.६६ लाखांचा निधी खर्च करण्याला परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांनी बीसीसीआयला ३ डिसेंबरपर्यंत भारत-इंग्लंडमध्ये होणा-या अन्य सामन्यांवरही इतकीच रक्कम खर्च करण्याची अनुमती दिली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असा लौकिक असलेल्या बीसीसीआयला सध्या सामन्याच्या आयोजनासाठी पैसे नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांमुळे बीसीसीआयला राज्य संघटनांना निधी देता येत नसल्याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या राजकोट कसोटीबाबतही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळे बीसीसीआयने आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निधी खर्च करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. जर खर्चासाठी निधी मिळाला नाही तर बुधवारपासून सुरू होणारा पहिला कसोटी सामना रद्द करावा लागेल, असे बीसीसीआयने याचिकेत म्हटले होते.
राज्य संघटना लोढा समितीच्या शिफारशींची जोपर्यंत अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत त्यांना निधी देण्यास बंदी घातली होती. त्यामुळे तिजोरी पैशांनी भरभरून वाहत असतानाही बीसीसीआयला निधी खर्च करता येत नाही आहे. निधी खर्च करता येत नसल्याने बीसीसीआयच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या असून, बुधवारपासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीचा खर्च कसा भागवायचा याची चिंता बीसीसीआयच्या धुरिणांना पडली होती.