ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - भारतीय संघराज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था आणि सर्वोच्च अपिली न्यायालय म्हणजेच सर्वोच्च न्यायालय लवकरच पेपरविरहित(paperless) होणार आहे. येत्या सहा ते सात महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात सर्व प्रकरणं ऑनलाइन पद्धतीनं सोडवण्यात येणार असून, न्यायालय पेपरलेस होईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत याचिका आणि दस्तावेजांसाठी पेपरची गरज भासणार नाही. त्याप्रमाणेच उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांच्या प्रकरणांची माहिती सर्वोच्च न्यायालय ऑनलाइन स्वीकारणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय यापुढे पेपरवर लिहिण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती कोर्ट रुम नंबर 1 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी वकिलांना दिली आहे. ते म्हणाले, वकिलांनी फक्त उच्च न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयांना आव्हान देणा-या याचिकाच सर्वोच्च न्यायालयात दाखल कराव्यात. तसेच आता लवकरच सर्वोच्च न्यायालय पेपरलेस होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं हे पाऊल कौतुकास्पद आहे. पेपरवर काम होत असल्यानं आजमितीस ब-याच फायली धूळ खात पडून आहेत. तसेच पेपर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तलही केली जाते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालये आणि कनिष्ठ न्यायालये करतात की नाही, हे येत्या काळातच समजणार आहे.
सर्वोच्च न्यायालय होणार पेपरलेस
By admin | Published: March 23, 2017 2:11 PM