नवी दिल्ली, दि. 3 - गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस दणका दिला आहे. गुजरातमधील 3 जागांसाठी 8 ऑगस्ट रोजी होणा-या निवडणुकीत नोटाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसची ही याचिका फेटाळत नोटाच्या वापराला परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आता मतदार नोटाचाही वापर करू शकणार आहेत.तत्पूर्वी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात नोटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. नोटावर बंदी न घातल्यास आमच्या आमदारांना दुस-या पक्षाची लोक खरेदी करतील. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव होईल, असं सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस म्हणालं होतं. मात्र काँग्रेसच्या या युक्तिवादाला न्यायालयानं केराची टोपली दाखवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभा निवडणुकीत नोटाच्या वापराशी संबंधित अधिसूचना 2014मध्येच जाहीर केली होती. आताच काँग्रेसला त्यातील त्रुटी कशा दिसून आल्या ?, असा प्रश्नही न्यायालयानं काँग्रेसला विचारला आहे. हा एक संवैधानिक मुद्दा आहे. ज्यावर वादविवाद करण्याची गरज नाही. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या याचिकेवर दोन आठवड्यांमध्ये उत्तर द्यावं, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. भाजपा नोटाच्या वापराच्या विरोधात असली तरी एनडीए सरकारनं यावर मौन बाळगलं आहे. महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल म्हणाले, गुजरात निवडणुकीत नोटाच्या वापरासंबंधी निवडणूक आयोगानं 24 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेवर सरकारचा काही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जबरजस्त दणका बसला होता. पार्टीतील वरिष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी पक्षाची साथ सोडली. याशिवाय, काँग्रेसच्या 6 आमदारांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. यातील कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी ( 2 ऑगस्ट ) छापे घातले. या छाप्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, आमच्या आमदारांवर दबाव आणण्यासाठीच छापे घालण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला होता. निवडणूक आयोगानंही या मुद्द्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या मते, राज्यसभा निवडणुकीत बॅलेट पेपरमध्ये नोटाचा वापर करण्याची ही पहिली घटना नाही, आयोगानं आकड्यांसह हे स्पष्ट केलं आहे. 2014पासून आतापर्यंत 25 वेळा राज्यसभा निवडणुका झाल्यात. ज्यात 95 जागांसाठी मतदान झालं. या सर्व जागांच्या मतदानावेळीसुद्धा नोटाचा वापर करण्यात आला होता, असंही निवडणूक आयोगानं काँग्रेसला सांगितलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला धक्का, राज्यसभा निवडणुकीत नोटाला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 12:49 PM