ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१- जैन धर्मातील संथारा व्रताला आत्महत्या ठरवत त्यावर बंदी घालण्याच्या राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाला सोमवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात जैन धर्मातील संस्थांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती व या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
जैन धर्मात अन्न - पाण्याचा त्याग करुन स्वेच्छेने देहत्याग करण्याची प्रथा असून याला संथारा व्रत असे म्हटले जाते. या व्रताविरोधात राजस्थानमधील निखिल सोनी यांनी राजस्थान हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने १० ऑगस्टरोजी संथारा प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. संथारा ही आत्महत्या मानली जावी आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणि त्यास साथ देणाऱ्यांवर कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला जावा, असे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात म्हटले होते. राजस्थान हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात देशभरातील जैन धर्मीयांनी तीव्र विरोध दर्शवला होता.