ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - मोबाइल कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणने ग्राहकांच्या हितासाठी कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला होता. या विरोधात दूरसंचार कंपन्या कोर्टात गेल्या. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायचा निर्णय योग्य ठरवला.
त्याविरोधात कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. अर्थात, दंड आकारणी करणे हे ट्रायच्या कक्षेत येत असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, कॉल ड्रॉप होण्यामागे दूरसंचार कारणीभूत आहेत का या पैलूचा विचार करायला हवा अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या प्रकरणी 10 मार्च रोजी सुनावणी आहे, त्यादिवशी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.