नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला सुनाविण्यात आलेल्या फाशीची शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्याला फाशी सुनावली होती.मध्यप्रदेश सरकारने १२ वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशीची शिक्षा सुनाविण्याचा नवा कायदा केला आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने त्याआधारे बलात्काराच्या एका प्रकरणात या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. राज्यात डिसेंबरमध्ये हा कायदा अमलात आल्यानंतर आतापर्यंत अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाºया १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या २०१६ च्या आकडेवारीनुसार देशात मध्यप्रदेशमध्ये सर्वांत जास्त बलात्काराच्या घटना घडल्या आणि त्यामध्ये खूपच कमी आरोपींना शिक्षा झाली. राज्यातील नव्या कायद्याद्वारे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºयाला किमान १४ वर्षांची सक्तमजुरी व कमाल फाशीची शिक्षा, अशी तरतूद आहे. मध्यप्रदेशनंतर राजस्थान, हरियाणा, अरुणाचल प्रदेश या राज्यांनीही असाच कायदा केला आहे.
बलात्काऱ्याच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:41 AM