Supreme Court Youtube News : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आल्याची घटना घडली. न्यायालयात झालेल्या सुनावणीचे व्हिडीओ गायब झाले असून, एका क्रिप्टोकरन्सीची जाहिरात दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. (supreme court youtube hacked)
सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल असून, त्यावर सुनावणीचे व्हिडीओही अपलोड केले जातात. मात्र, अज्ञाताकडून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे तंत्रज्ञान विभागाचे रजिस्टारकडून याबद्दल माहिती देण्यात आली.
सुनावणीचे सगळे व्हिडीओ गायब
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा एकही व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर दिसत नाही. एक व्हिडीओ प्ले होत असून, तो क्रिप्टोकरन्सी XRP च्या जाहिरातीचा आहे.
रिप्पल असे असे नाव दिसत असून, 'ब्रॅड गार्लिंगहाऊस : रिप्पल रिस्पॉन्ड्स टू द एसईसी २ बिलियन डॉलर फाईन. एक्सआरपी प्राइस प्रेडिक्शन'
सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंठपीठासमोर खटल्यांची सुनावण्यांचे या यूट्यूब चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.
सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले होते ५०० रुपये
काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने अकाऊंट सुरू करून, पैसे मागितल्याची घटना घडली होती. घोटाळेबाजाने सरन्यायाधीश असल्याचे भासवून एका व्यक्तीकडे ५०० रुपये मागितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हाही दाखल केला होता.