नवी दिल्ली-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे संसदेत विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. आज सुप्रिया सुळे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. सुळे यांनी लोकसभेत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा मांडला. "जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. त्यामुळे दर महिन्याला निवडणुका घ्याव्यात", असा टोला सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला आहे.
"या सरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमताने विजयी केले. पण निवडणूका संपताच या सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करीत नाही. आमचं तर म्हणणं आहे की, आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे सरकार तिकडे व्यस्त राहील परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत", अशी टिपण्णी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी महिला अधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा देखील मांडला. अमरावतीच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग या दिल्ली येथे स्थायी समितीसमोर उपस्थित राहण्यासाठी आल्या असता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय घेण्यात आले होते. महिला अधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाचा हा मुद्दा असून तो राखला जाणे आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.