नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बरेच दिवसच चाललेल्या तिढ्यानंतर आज अखेर महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण वैशिष्यपूर्ण ठरले. सुप्रिया सुळेंनी दत्त दत्त दत्ताची गाय या कवितेच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने दत्त आणि गाय सोडून सगळ्यावर जीएसटी लावलाय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
आपल्या खिशातून काय जातंय आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतंय, हीच भाषा सर्वसामान्यांना समजते. मोदी सरकारने कशा कशावर जीएसटी लावलाय हे मी तुम्हाला सांगते. आज मी मराठीतील एक कविता वाचून दाखवते. दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप. ही कविता ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. यातील दत्तगुरू भगवान आणि गाय या दोघांना सोडून सर्वांवर मोदी सरकारने जीएसटी लावला आहे. सुदैवाने देवावर जीएसटी लावलेला नाही. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावलाय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
निशिकांत दुबे म्हणाले की, देशातील प्रत्येक गरीबाला आम्ही भोजन देत आहोत. देशाचा पंतप्रधान गरीब, शोषित, वंचितांना भोजन देतो तेव्हा ते त्यांचे आशीर्वाद घेतात, हिशेब मांडत नाहीत. निशिकांतजी विचारतात की, तुम्ही आभार मानणार नाही का, देशाची अशी अवस्था झालीय का की देशातील गरीब पंतप्रधानांना म्हणेल आम्हाला दोन वेळचं भोजन दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हीच तुमची विचासरणी आहे का असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी ६० वर्षांत काही झालं नाही असं म्हणण्यावरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, तुम्ही ६० वर्षांकडे बोट दाखवता. पण आठ वर्षेही खूप असतात. एवढ्या काळात नवी सूनही तयार होते, ती घराची जबाबदारी नाकारू शकत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.