नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की राज्यातल्या इतर खासदारांनी राज्यपाल महोदयांनी जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण मी वेगळा मुद्दा उपस्थित करणार आहे. केंद्रात मनमोहन सिंग सरकार असताना केंद्र सरकारने ७० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले होते. आताही शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे.
सुप्रिया सुळेसंसदेत म्हणाल्या की, ''शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. केंद्र सरकारने नुकतेच एमएसएमईला आर्थिक सवलती देण्याची भाषा केली होती. पण ताटामध्ये अन्न वाढणाऱ्या शेतकऱ्याचा प्श्न आधी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे माफ करावे.''
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यापूर्वी शिवसेनेच्या खासदारांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्यात यावी, तसेच राज्यातील अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेना खासदारांना आज संसदेच्या आवारात आंदोलन केले.
संसद भवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेना खासदारांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील आणि राज्यसभेतील खासदारांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, हेमंत गोडसे, राजन विचारे आदी उपस्थित होते. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करत शिवसेना खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला.