नवी दिल्ली - देशात सध्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाचाची चर्चा होत आहे. गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. या विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध केला. त्यावेळी अमित शहांनी तब्बल 6 ते 7 तास या विधेयकावर चर्चा केली. यादरम्यान, त्यांच्याकडून एक चूक झाली होती, जी चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली.
नागरिकत्व सुधारणा विधेयकास काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र, राज्यसभेत शिवसेनेनं आपली भूमिका बदलली. गृहमंत्री अमित शहांनी लांबलचक भाषण करुन या विधेयकातील विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी, शेवटच्या भाषणा अमित शहांकडून थोडीशी चूक झाली होती. खासदार सुप्रिया सुळेंनी ही चूक शहांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर, शहांनीही चूक कबुल असल्याचं सांगत ती दूरुस्त केल्याचंही स्पष्टीकरण दिलं.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे 2016 रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. पण, तेव्हा लोकसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीपुढे मांडण्यात आले. संयुक्त संसदीय समितीमध्ये बोलताना, अमित शाह म्हणाले की, “लोकसभेत या विधेयकावर धर्माच्या मुद्द्यावरुन कोणाचाही आक्षेप नाही.” मात्र, सुप्रिया सुळेंनी अमित शहांच्या या वाक्याला कोट करत धर्माच्या मुद्द्याला आमचा आक्षेप आहे, आम्हीही लोकसभेतील सदस्य आहोत, असे म्हणत अमित शहांची चूक लक्षात आणून दिली. सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर अमित शहा यांनी आपली चूक कबुल केली. तसेच, सदरची चूक लक्षात आणून देत या प्रस्तावातील भाषणात मी बदल केल्याचंही अमित शहांनी लोकसभेत विधेयकावरील चर्चेवेळी सांगितले.