नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दरम्यान, महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिन हा देशाचा उत्सव असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे माहिती समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याविरोधात ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. ''महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करत आहे,'' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारल्याने सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 4:01 PM