नवी दिल्ली : उर्दूचा शायराना अंदाज. सुफी संगीताचा साज. कबिराचे दोहे नि अमीर खूसरोच्या अदबशीर कव्वालीने संगीत साधक स्व. ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित सुफी संगीताची अनवट मैफल शुक्रवारी उत्तररात्री रंगली! संसद रस्त्यावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला.
श्रवणाचा हा प्रवास अनात्म भावातून आत्मिक अनुभूतीकडे नेणारा ठरला! उस्ताद चांद निझामी, शादाब फरिदी व सोहराब फरिदी निझामी या निझामी बंधुंनी सुफी संगीतातील स्वरसाज रसिकांसमोर उलगडला. जगण्यातील दु:ख, वेदना, निर्मिकाप्रती असलेली अतीव ओढ त्यांच्या एकेक स्वरातून प्रकटत होती. शेकडो दर्दी रसिकांनी याचा मनमुराद आनंद लुटला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ, संगीतप्रेमी व राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी व त्यांच्या पत्नी अनिता, पीटीआयचे एडिटर इन चीफ विजय जोशी व त्यांच्या पत्नी जयश्री बालसुब्रह्मण्यम, टाइम्स म्युझिकच्या कंटेंट प्रमुख गौरी यादवडकर, राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, पद्मविभूषण शिल्पकार राम सुतार, विख्यात कवी व ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष अशोक वाजपेयी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्या उपस्थितीने या सोहळ्यात रंग भरले.
‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत २०१९’ पुरस्कार प्राप्त शिखर नाद कुरेशी (मुंबई) यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सूर संगीताची आराधना करीत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी २४ वर्षे लढलेली माझी पत्नी संगीत साधक स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू झालेली ही संगीत यात्रा राष्ट्रीय स्तरावर नेणार असल्याची भावना विजय दर्डा यांनी व्यक्त केली. राजकारणात नसतो, तर गायक झालो असतो व मलाही आज ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ मिळाला असता, अशी खुसखुशीत टिप्पणी करून विजय गोयल यांनी गीत-संगीत आवडीचे गुपित उलगडले. ‘लोकमत’ समाचारचे ब्यूरो चीफ शीलेश शर्मायांनी सूत्रसंचालन केले.
सोहळ्याला दिल्लीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूर ज्योत्स्ना अँथमचे अनावरण यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांच्या हस्ते झाले. ‘जीवन की ज्योत्स्ना और ज्योत्स्ना का जीवन’ या अँथमचे लेखक विख्यात कवी व माजी राज्यसभा सदस्य जावेद अख्तर आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगम व अलका याज्ञिक यांनी त्याला स्वरसाज चढविला आहे. अभिषेक मनू सिंघवी यांनी 'महावीर नमन' या टाइम्स म्युझिकने प्रकाशन केलेल्या सीडीचा आवर्जून उल्लेख केला. स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी यातील सर्व गीते लिहिली आहेत. सोनू निगम, अलका याज्ञिक व वैशाली सामंत यांनी त्यास स्वरसाज चढविला. प्रसिद्ध संगीतकार उत्तम कुमार यांनी संगीत दिले आहे, अशी माहिती सिंघवी यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रायोजक: सेलो, वराह इन्फ्रा, रॅडिको,
पॉवर्ड बाय: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड,
सह प्रायोजक : दिलीप बिल्डकॉन, स्पोर्ट्स इंडी (द ऑनलाइन स्पोर्ट्स हब), यूएनएफ, सपोर्टेड बाय रेमंड्स.
आउटडोअर प्रायोजक: ब्राइट आउटडोअर मीडिया प्रा.लि
सिनेमा प्रायोजक : कार्निव्हल सिनेमाज.