Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. अलीकडेच बागेश्वर बाबांचा दरबार बिहारमधील पाटणा येथे भरला होता. त्यावरूनही अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यातच बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना सुरतच्या एका व्यापाऱ्याने ओपन चॅलेंज दिले. मात्र, हे आव्हान दिल्याच्या काही तासांतच त्याने यु टर्न घेतला आहे.
धीरेंद्र शास्त्री गुजरातमधील अहमदाबाद, राजकोट आणि सुरत या ठिकाणी भव्य दरबार घेणार आहेत. बिहारपाठोपाठ गुजरातमध्ये धीरेंद्र शास्त्री यांच्या दौऱ्याला विरोध होत आहेत. यातच सुरत येथील जनक बाबरिया या हिरे व्यापाऱ्याने शास्त्री यांना एक आव्हान दिले आहे. मला त्यांच्या भव्य दरबारात बोलावले गेले, तर पॉलिश केलेल्या हिऱ्यांचे एक पाकीट घेऊन तिथे जाईन. त्या पाकिटात किती पॉलिश केलेले हिरे आहेत, हे त्यांनी ओळखून दाखवले तर २ कोटी रूपयांच्या हिरे तिथे अर्पण करेन. त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचे मान्य करेन, असे आव्हान जनक यांनी दिले होते. मात्र, आता यावरून जनक यांनी यु टर्न घेतला आहे.
जनक यांनी पत्र लिहून वाद थांबवण्याची केली विनंती
या आव्हानानंतर जनक प्रसिद्धीझोतात आले. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही जनक आव्हानाचा पुनरुच्चार करत होते. मात्र, यानंतर आता जनक यांनी एक पत्र लिहिले आहे. धीरेंद्र शास्त्री यांना दिलेल्या चॅलेंजवरून बराच वाद सुरू झाला आहे. गुजरातमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. या वादामुळे आपला मानसिक छळ होत आहे. अशा परिस्थितीत आता आपल्याला हे प्रकरण संपवायचे आहे. या वादानंतर आपल्याला सतत फोन येत आहेत. यामुळे हा वाद इथेच संपवत आहे. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे जनक यांनी या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार २६ आणि २७ मे रोजी सुरत येथे होणार आहे. सुरत, अहमदाबाद आणि राजकोट येथील दिव्य दरबाराची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार असल्याचे व्यापाऱ्याने म्हटले होते.