सूरत: दिवाळीच्या निमित्तानं आपल्या कर्मचाऱ्यांना कार भेट देणारे हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हरि कृष्णा एक्सपोर्ट्सचे चेअरमन असलेले ढोलकिया या दिवाळीला त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांना कार भेट देणार आहेत. याशिवाय 900 कर्मचाऱ्यांना एफडीदेखील देण्यात येणार आहे. गुरुवारी डायमंड किंग सावजी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देतील. पहिल्यांदाच या समूहातील चार कर्मचाऱ्यांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येईल. नवी दिल्लीत हा कार्यक्रम संपन्न होईल. आमच्या लॉयल्टी कार्यक्रमाच्या अंतर्गत यंदा दीड हजार कर्मचाऱ्यांची निवड झाल्याची माहिती सावजी ढोलकिया यांनी दिली. यातील 600 जणांनी गिफ्टमध्ये कार स्वीकारण्यास सहमती दर्शवली. तर 900 कर्मचाऱ्यांनी एफडीला पसंती दिली. पहिल्यांदाच आमच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळी गिफ्ट मिळेल. आमच्या चार कर्मचाऱ्यांचा सन्मान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये एका दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे, असं ढोलकिया यांनी सांगितलं. हरि कृष्णा एक्सपोर्ट्सच्या चार कर्मचाऱ्यांचा मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान होईल. त्यानंतर मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. यंदा कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर कंपनी 50 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती ढोलकिया यांनी दिली. 2011 पासून हरि कृष्णा एक्सपोर्ट्सनं लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला होता. तेव्हापासून सावजी ढोलकिया कायम चर्चेत राहिले आहेत.
'त्या' कंपनीत यंदाही दिवाळीची बहार; कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 600 कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:03 PM