सूरत : सुरतमधील सरथाणा परिसरातील तक्षशीला इमारतीला शुक्रवारी ( 24 मे ) भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 20 विद्यार्थांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सूरत क्राइम ब्रांचकडे सोपविण्यात आला आहे.
तक्षशीला इमारतीला लागलेल्या या भीषण आगीत एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता सात जणांचे प्राण वाचवले आहे. जतिन नकरानी असं या तरुणाचं नाव असून त्याने अग्निकल्लोळात न डगमगता विद्यार्थ्यांना वाचवलं आहे. आगीची माहिती मिळताच जतिनने क्लासमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं. तर आणखी दोन मुलांना वाचवण्यासाठी तो वरच्या मजल्यावर पोहोचला. मात्र विद्यार्थ्यांचा जीव वाचवताना जतिन खाली पडून जखमी झाला आहे.
इमारतीतील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, जतिनने आगीतून काही विद्यार्थ्यांचा जीव वाचवला. मात्र आगीपासून स्वत: चा बचाव करताना तो इमारतीतून खाली पडला. यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला असून तो जखमी झाला आहे. उपचारासाठी जतिनला तातडीने जवळच्या महावीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तक्षशीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. याच कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली होती. आग लागल्यानंतर क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला आणि बाहेर निघायला कुठलाही मार्ग नसल्याने जीव वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क चौथ्या मजल्यावरुन खाली उड्या मारल्या. यात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने सुरतमधील अशा कोचिंग क्लासेसवर बंदी घातली आहे. अग्निशमन विभागाने एनओसी दिल्यानंतरच कोचिंग क्लासेसवरील बंदी हटविण्यात येणार आहे. तर इमारत आग प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कोचिंग क्लासेसच्या दोन संचालकांना अटक केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सूरत क्राइम ब्रांचकडे सोपविला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी स्थानिक प्रशासनाला तातडीने आगीची चौकशी करण्याचे आणि या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आगीच्या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत.