गुजरातच्या सूरतमध्ये इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येविरोधात पत्नी पीडित पतींनी निदर्शनं केल्याची घटना समोर आली आहे. हातात फलक घेऊन आंदोलकांनी कायद्यातील महिलांच्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि पुरुषांसाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली. खोट्या केसेस करून अत्याचार झालेल्या पुरुषांना न्याय देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असं आंदोलकांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरत शहरातील लाईन्स सर्कलमध्ये हे आंदोलन करण्यात आलं. अतुल सुभाषने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ बनवला होता आणि पत्नीने छळ केल्याचा आरोप केला होता. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याबाबत कायद्यात महिलांना दिलेल्या स्वतंत्र अधिकारांचा गैरवापर होत असल्याची चर्चा आहे.
आंदोलकांनी वेगवेगळे फलक हातात घेऊन अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाचा निषेध केला. आंदोलक पत्नी पीडित पतींपैकी काहींनी फलकावर 'पुरुषांचे हक्क हे मानवी हक्क' असं लिहिलं होतं, तर काहींनी २०१४ ते २०२२ या कालावधीतील पुरुषांच्या आत्महत्येच्या घटनांचे आकडे लिहिले होते.
कोणी सरकारला पुरुष आयोग नेमण्याची विनंती करत होते तर कोणी खोटी केस हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे असं म्हणत होतं. काहींनी सेफ फॅमिली सेव्ह नेशन लिहून विरोध केला. काही फलकावर मॅन नॉट एटीएम असंही होतं. आंदोलकांनी पुरुषांच्या व्यथा त्यांच्या खास शैलीत मांडल्या. या आंदोलनात सूरतचे चिराग भाटियाही सहभागी झाले होते.
अतुल सुभाषने खोट्या केसमुळे आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबाबत आम्ही आंदोलन करत आहोत. अतुल सुभाषला न्याय मिळाला पाहिजे आणि पुरुषांसाठी योग्य कायदा झाला पाहिजे. अनेक महिला पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. एखादे प्रकरण चुकीच्या पद्धतीने चालल्याचं न्यायालयात सिद्ध झालं तरी न्यायात महिलांना शिक्षेची तरतूद नाही.