सूरत:गुजरातच्या सुरतमधून फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 32 लाख रुपये किमतीच्या हिऱ्यांऐवजी गुटख्याचे पॅकेट दिल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दलालाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापारी ऋषभ व्होरा यांनी सांगितले की, त्यांनी एका पार्सलमध्ये 32 लाख रुपयांचे मौल्यवान हिरे ठेवले होते. आरोपीने 32,04,442 रुपये किमतीचा पॉलिश आणि नैसर्गिक हिरे दुसऱ्या व्यापाऱ्याला विकण्याच्या बहाण्याने घेतले. दलालाने 13 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान तीन सीलबंद पार्सलमध्ये हिरे घेतले आणि टोकन मनी म्हणून त्याला 2 लाख रुपये दिले.
उर्वरित पेमेंट तीन-चार दिवसांत करुन असे आरोपीने सांगितले. पेमेंट न झाल्याने व्होरा यांनी त्यांचे पार्सल परत मागितले. त्यांनी ते पार्सल उघडले असता, त्यात हिऱ्यांऐवजी गुटख्याची पाकिटे आढळली. याप्रकरणी व्होरा यांनी तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात पोलिसांनी कलम 420 (फसवणूक) आणि 409 (गुन्हेगारी विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून यात आणखी कोणी व्यावसायिकाचा हात आहे का, याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.