ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. १९ - पटेल समूदायासाठी आरक्षणाची मागणी करत संपूर्ण गुजरात ढवळून काढणा-या हार्दिक पटलेला सूरत पोलिसांनी एकता यात्रेपूर्वी ताब्यात घेतले आहे. सरकारने परवानगी नाकारलेली असतानाही मोर्चा काढण्याच्या तयारीत असणा-या
हार्दिक पटेल व त्याच्यासह रॅलीत सामील झालेल्या ७८ समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वरच्छा पोलिस स्थानकात नेले.
गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असून अनेक सभा व मोर्चा काढत त्यांनी गुजरातला वेठीस धरले आहे. याच मागणीसाठी त्यांनी गेल्.या दोन आठवड्यात दोनवेळा 'रिव्हर्स दांडी मार्च'ची घोषणा केली होती. मात्र सरकारने परवानगी नाकारल्याने ती रद्द करण्यात आली. अखेर त्यात थोडा बदल करत हार्दिकने 'एकता यात्रे'ची घोषणा करत नौसारीच्या जिल्हाधिका-यांकडे आजच्या यात्रेसाठी परवानगी मागितली. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकारने कालच (शुक्रवार) रॅलीला परवानगी नाकारली. त्यामुळेभडकलेल्या हार्दिक पटेलने कोणतीही किंमत मोजून यात्रा काढण्याचा निर्धार केला. मात्र आज सकाळी ही यात्रा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी हार्दिक व समर्थकांना ताब्यात घेतले. गुजरात पोलिस व राज्य सरकार हेच राज्यात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत आम्ही सविनय कायदेभंगाच्या मार्गाने पुढे जाऊ असे हार्दिकने म्हटले.