गुजरातच्या सूरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घरामध्ये गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एक दाम्पत्य आपल्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होतं. त्याच दरम्यान तरुणाला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला. शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरत लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आकार रेसिडन्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या दीपक पाटील यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला. दीपक पाटील हे मूळचे मालेगावचे आहेत. पत्नी देविकासोबत ते सूरतला वास्तव्यास होते. हिऱ्यांच्या कंपनीत ते नोकरी करत असल्याची माहिती मिळत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने 30 सप्टेंबरच्या रात्री दीपक पत्नी आणि मित्राच्या कुटुंबासोबत गरबा खेळण्यासाठी जाणार होते.
मित्राच्या घरी अचानक पाहुणे आल्याने त्यांना हा गरब्याचा प्लॅन रद्द करावा लागला. त्यामुळे दीपक आणि देविकाने आपल्या फ्लॅटच्या हॉलमध्ये गरबा खेळायचं ठरवलं. मोबाईलवर गाणी लावून दोघांनी ठेका धरला. गरबा खेळता खेळता देविका थकल्या. त्या एका जागी बसल्या. मात्र दीपक गरबा खेळत होते. रात्री दहाच्या सुमारास दीपक यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन पडले.
देविका यांनी तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने दीपक यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दीपक आणि वेदिका यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. दीपक यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल रविंद्र करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"