नवी दिल्ली : एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ९ मार्चला रात्री ११.५० पर्यंत चालणार आहे.आॅनलाइन फी जमा करण्याची मुदत १० मार्च राजी रात्री ११.५० पर्यंत आहे. आसाम, जम्मू-काश्मीर ङ्म मेघालय येथील अर्जदार वगळता उर्वरित सर्वांसाठी आधार नंबर जमा करणे अनिवार्य आहे. जर आधार नंबर, नाव, जन्मतारीख अथवा लिंग याबाबत माहितीत फरक आढळल्यास उमेदवार अर्ज दाखल करु शकणार नाहीत. एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी वयोमर्यादा १७ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय प्रवेशाच्या वेळी १७ वर्षे असायला हवे अथवा ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी उमेदवार १७ वर्षांचा असायला हवा. या प्रवेश परीक्षेच्या वेळी अधिकाधिक वयोमर्यादा २५ वर्षे असायला हवी. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठी तसेच अपंग व्यक्तीचे हक्क कायदा २०१६ नुसार त्यांना वयामध्ये ५ वर्षांची सूट असणार आहे.कोण देऊ शकतो परीक्षा?विद्यार्थी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, भौतिक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये एकत्रित किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. www.cbseneet.nic.in या बोर्डाच्या वेबसाइटवर विद्यार्थी फक्त आॅनलाइन अर्ज करु शकतात.
देशभरात ‘नीट’ परीक्षा होणार ६ मे रोजी; आॅनलाइन अर्जासाठी ९ मार्चपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:40 AM