Suresh Gopi News : काल, म्हणजेच 9 जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी सोहला पार पडला. पंतप्रधान मोदींसह 69 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावत केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनीदेखील केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शपथविधीनंतर अचानक सुरेश गोपी मंत्रिपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. विविध वृत्त वाहिन्यांमध्येही ही बातमी आली. आता त्यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे.
सुरेश गोपी काय म्हणाले?यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच केरळमध्ये कमळ फुलले. भाजप नेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. या विजयानंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. काल त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आता त्यांनी अशा सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, "काही मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या बातम्या पसरवत आहेत की, मी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहे," असे त्यांनी सांगितले.
सुरेश गोपी यांच्याबाबत काय दावा केला जात होता? सुरेश गोपी यांना मंत्रिपद नकोय, त्यांना खासदार राहून त्रिशूरच्या लोकांसाठी काम करायचे आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरेश गोपी म्हणाले की, "खासदार म्हणून काम करण्याचं माझं ध्येय आहे. मी काहीही मागितलेलं नाही, मी म्हणालो होतो की, मला या पदाची गरज नाही. मला वाटतं की मला लवकरच पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहीत आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखर चांगले काम करेन. तसेच, मी काही चित्रपट साईन केले आहेत, ते मला कोणत्याही किंमतीत करायचे आहेत," असे सुरेश गोपी यांनी सांगितल्याचा दावा केला जात होता. पण, आता त्यांनी स्वतः हे सर्व दावे खोडून काढले आहेत.