ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. २३ - मोदी सरकार सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी लोटूनही रेल्वे निद्रावस्थेत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत असतानाच आता या खात्याचे मंत्री सुरेश प्रभू हे एका कार्यक्रमात गाढ झोपी गेल्याने सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. दक्षिण भारतातील बहुतांशी वृत्तपत्रांमध्ये प्रभूंच्या निद्रासनाची छायाचित्र झळकली आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोच्ची येथे योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते. योग करत असताना प्रभू झोपी गेले. योगासन करुन काही वेळ झाल्यावरही प्रभू उठत नसल्याने त्यांच्या बाजूला योग करणारी मंडळी चक्रावून गेली. अखेरीस योग शिक्षकाने जाऊन त्यांना उठवले व प्रभूंना जाग आली. हा सर्वप्रकार कॅमे-यात कैद झाला असून हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनीदेखील हा फोटो शेअर केले आहे. 'मी फक्त हेच एक आसन करु शकतो' असा उपरोधिक टोलाही थरुर यांनी लगावला आहे. प्रभू दिवसरात्र मेहनत करुन रेल्वेत सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहेत, यामुळेच योगासनानिमित्त मिळालेल्या वेळेचा त्यांनी झोपेसाठी सदुपयोग केला असावा अशी प्रतिक्रियाही काही जणांनी व्यक्त केली. योग दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी योगकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्र्यांना धाडण्यात आले होते.