कोलकाता : रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार वाढल्याने संपावर जाण्याचे ऐकले होते. मात्र, पश्चिम बंगालमधील एका वैतागलेल्या डॉक्टरने वैद्यकीय पेशा सोडून रोजगारासाठी चक्क ब्युटी पार्लर खोलले आहे.
बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बारासात येथील हा डॉक्टर आहे. शल्यचिकित्सक नीलाद्रि बिस्वास यांनी मारहाणीच्या प्रकारांना घाबरून यूनिसेक्स ब्यूटी पार्लर उघडले आहे. काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांच्या एका फेसबुक पेजवर त्यांनी याबाबत सांगितले होते. मात्र, कोणी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांना कंटाळून आपण आपला वैद्यकीय पेशा सोडून इतर व्यवसायामध्ये करिअर करणार असल्याचे म्हटले होते.
बिस्वास यांनी महिला आणि पुरुष या दोघांसाठीही हे पार्लर खोलले आहे. या पार्लरमध्ये येणाऱ्या डॉक्टरांना विशेष सूट देण्यात येणार आहे. तर स्वास्थ्य विभागातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. बिस्वास यांनी कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि आरजी कार मेडिकल कॉलेजमधून एमएस केले होते.
बिस्वास हे काही अपयशी डॉक्टर नव्हते. त्यांनी कमी वयातच चांगला शल्यचिकित्सक म्हणून नाव कमावले होते. त्यांनी हावडा, बोरासात या भागातील हजारो लोकांवर उपचार केले होते.