हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी नोएडामध्ये क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचवेळी नोएडाच्या जिल्हा रुग्णालयातील एका आय सर्जनला सर्जरी करताना हार्ट अटॅक आला. मात्र, सहकारी डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवल्याने सर्जनचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
नोएडा जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे. आय सर्जन म्हणून तैनात असलेले डॉ. सतेंद्र हे मंगळवारी ऑपरेशन थिएटरमध्ये एका रुग्णाची सर्जरी करण्यात व्यस्त होते. याच दरम्यान त्यांना अचानक खूप घाम येऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले.
सतेंद्र यांच्या चेहऱ्यावर घाम आणि अस्वस्थता सहकारी डॉक्टरांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं आणि जिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं. तिथे डॉ. सतेंद्र यांची चाचणी झाली. तेव्हा रिपोर्ट पाहून त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सतेंद्र यांना नोएडा येथील एका खासगी रुग्णालयात नेलं.
कार्डियोलोजिस्ट विभागाच्या डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली. सहकारी डॉक्टरांनी तत्परता दाखवल्याने सर्जनला वेळीच रुग्णालयात नेण्यात आल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली. सध्या डॉक्टर सतेंद्र हे सुखरूप आहेत.
याआधी नोएडामध्ये क्रिकेट सामना खेळणाऱ्या एका तरुणाला हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला होता. काही लोक स्टेडियममध्ये सामना खेळत होते. उत्तराखंडचा रहिवासी 36 वर्षीय विकास नेगी बॅटींग करण्यासाठी आला. मात्र धावताना तो बेशुद्ध पडला. हे पाहून मित्र धावत आले आणि बेशुद्ध अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केलं.