"कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करताना लष्करातील जवान कधीही कसलाही पुरावा मागे ठेवण्यासंदर्भात विचार करत नाहीत," असे लष्कराच्या पूर्व कमांडचे जीओसी-इन-सी लेफ्टनंट जनरल आरपी कालिता यांनी म्हटले आहे. ते 2016 मध्ये पाकिस्तानात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या (Surgical Strike) पुराव्यांसंदर्भात विरोधी पक्षांतील काही नेत्यांच्या मागणीच्या प्रश्नाला शुक्रवारी उत्तर देताना बोलत होते.
कोलकात्यात प्रेस क्लबमध्ये ‘प्रेस से मिलिए’ या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, हा एक राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. मला वाटते, की देश भारतीय सशस्त्र दलावर विश्वास ठेवतो. यावेळी, ऑपरेशन दरम्यान लष्कर काही पुरावे ठेवते का? असा प्रश्न केला असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. ते म्हणाले, जेव्हा आम्ही एखादे ऑपरेशन करतो, तो त्या ऑपरेशनचे कसलेही पुरावे आम्ही मागगे ठेवत नाही.
काँग्रेस नेत्याने मागीतले होते सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी नुकताच सर्जिकल स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राइक आणि अनेक लोकांना मारल्याचे बोलते, मत्र याचा कसलाही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले होते. ते खोटे बोलून सरकार चालवत आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला वेगळे ठेवले होते. यावेळी देश हितासाठी पक्ष सर्व प्रकारच्या लष्करी कारवाईचे समर्थन करतो, असे काँग्रेसने म्हटले होते.
एवढेच नाही, तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचेही म्हटले होते. तसेच, लष्कर आपले काम अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे. त्यांना कसल्याही प्रकारचे पुरावे देण्याची आवश्यकता नाही, असेही राहुल यांनी म्हटले होते.