ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे रशियाने समर्थन केले आहे. तसेच सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात लढण्यास भारताला रशियाने कायम पाठिंबा दिला असल्याचं रशियाचे भारतामधील राजदूत ऍलेक्झांडर एम कदाकिन यांनी म्हटले आहे.
‘प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आम्ही या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन करतो,’ भारताच्या लष्करी तळांवर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप सैनिकांचा आणि नागरिकांचा बळी जातो. हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे,अशी प्रतिक्रिया कदाकिन यांनी दिली आहे.
याशिवाय पाकिस्तानसोबतचा संयुक्त लष्करी सराव हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत नसल्याने भारताने याबाबत काळजी करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रशिया संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीतील स्थायी सदस्य असल्याने या पाठिंब्याला मोठे महत्त्व आहे.