रांची, दि. 15 - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान घुसून करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंग आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. ते खरे सर्जिकल स्ट्राईक होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे लालूप्रसाद यादव यांनी सांगितले. याचबरोबर चारी बाजूने हल्ले होत आहेत. चीनचे आक्रमण वाढत चालले आहे. केंद्र सरकारकडे युद्धासाठी दहा दिवसांचा सुद्धा युद्धसाठा नाही आहे, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.
गेल्यावर्षी सर्जिकल स्ट्राईक...गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी एकाही भारतीय जवानाला दुखापत झाली नव्हती. अत्यंत शूरपणे भारतीय जवान पाकिस्तानच्या सीमेत घुसले होते. यावेळी जवानांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने दहशतवाद्यांवर चांगलीच जरब बसली. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जवानांचा किर्ती चक्राने सन्मान करण्यात आला.
लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपत शस्त्रसाठा - कॅगभारताच्या संरक्षणव्यवस्थेविषयी गंभीर चिंता उत्त्पन्न करणारे दोन अहवाल महालेखापरिक्षकांकडून (कॅग) प्रकाशित करण्यात आले आहेत. कॅगच्या अहवालानूसार भारतीय लष्कराला सध्या मोठ्याप्रमाणावर शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासत असून, यदाकदाचित युद्धप्रसंग उद्भवल्यास लष्कराकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.