अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. 97 कोटी मतदार देशात सत्तेत कोण असेल, याचा फैसला घेईल आणि त्याचा निकाल लागेल तो 4 जून रोजी. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट, लोकप्रियता अन् दुसरीकडे राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या इंडिया आघाडीची एकमूठ यांची आजपासून 83 दिवस सत्वपरीक्षा होणार आहे.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश म्हणाले की, "निवडणूक आयोगाने काल दिलेले भाषण म्हणजे निवडणूक आयोग निःपक्षपाती नाही, त्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिलेला नाही, आम्ही वेळ मागितला पण त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही कागदपत्रे देतो, निवडणूक आयोग सुनावणी घेत नाही, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरोधात तक्रार आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे, केवळ विरोधकांवर कारवाई करू नये."
"इलेक्टोरल बाँड्सचे सर्व पैसे भाजपाकडे गेले आहेत आणि मोदी, अमित शाह यांना याचं उत्तर द्यावे लागेल. 20 कोटी रुपयांचा नफा असलेली आणि 200 कोटी रुपयांची देणगी देणारी कंपनी इलेक्टोरल बाँड मनी लाँड्रिंगचच रुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या काँग्रेसचं अकाऊंट बंद केलं आहे. आम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अकाऊंटवर बंदी घालून मोदी सरकार काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करत आहे" असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.