श्रीनगर : दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी एका चकमकीदरम्यान शहीद झाले. मात्र, शहीद होण्यापूर्वी सिंह यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाचवत तीन दहशतवाद्यांना ठार करत साहसी वृत्ती दाखविली.
पंजाबच्या गुरुदासपूरचे लान्स नायक संदीप सिंह रहिवासी होते. संदीप सिंह यांनी ४ पॅरा कमांडो पथकांच्या साथीने तंगधार सेक्टरमधील गगाधारी भागात दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरु केली होती. ऑपरेशन ऑलआऊटदरम्यान त्यांना काही संदिग्ध हालचाली दिसून आल्या. यानंतर त्यांच्या टीमने पुढे जाऊन दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सिंह यांच्या पथकाने जोरदार प्रत्यूत्तर दिले. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. मात्र, दहशतवाद्यांना झाडलेल्या काही गोळ्या सिंह यांना लागल्याने ते जखमी झाले. यादरम्यान, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही हल्ल्यातून वाचविले. जखमी अवस्थेतच त्यांनी दहशतवाद्यांवर गोळ्या झाडणे सुरुच ठेवले. यावेळी दहशतवाद्यांनी झाडलेली एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि लान्सनायक सिंह शहीद झाल्याचे लष्कराच्या सुत्रांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे सापडली आहेत.
लान्स नायक संदीप सिंह यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. सिंह हे सर्जिकल स्ट्राईकच्या टीमचा हिस्सा होते.