ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - उरीच्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरघुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्याच्या या ऑपरेशनमध्ये लष्कराने कार्टोसॅट कुटुंबातील उपग्रहांची मदत घेतली होती. कार्टोसॅटने पाठवलेल्या उच्च क्षमतेच्या छायाचित्रांमुळे लष्कराला आपले टार्गेटस निवडण्यात मदत झाली होती.
कार्टोसॅट - 2 मालिकेतील उपग्रह खास संरक्षण दलांना डोळयासमोर ठेऊन बनवण्यात आले आहेत. शुक्रवारी कार्टोसॅट मालिकेतील सहाव्या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारतीय संरक्षण दलांना मोठी मदत मिळणार आहे. शत्रू प्रदेशातील दहशतवाद्यांचे तळ, बंकर याची खडानखडा माहिती मिळेल.
या उपग्रहाला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. कार्टोसॅट-2 मुळे भारताची टेहळणी क्षमता, शत्रू हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या भारताच्या क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्यावेळी ज्या कार्टोसॅटची मदत घेण्यात आली तो उपग्रह जून महिन्यात प्रक्षेपित करण्यात आला होता.
आणखी वाचा
2005 साली पहिल्यांदा कार्टोसॅट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. 2007 मध्ये कार्टोसॅट-2 ए प्रक्षेपित करण्यात आला. यामुळे
शेजारच्या पाकिस्तान, चीनमध्ये होणा-या क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती मिळते. कार्टोसॅट मालिकेतील उपग्रह फक्त उच्च क्षमतेची छायाचित्रेच पाठवत नाही तर, अवकाशातून संवदेनशील ठिकाणांची व्हिडीओ रेकॉर्डींग करुनही पाठवतो.
कार्टोसॅटची वैशिष्टये
- कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांना भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक करताना या उपग्रहांची मदत घेण्यात आली होती.
- उच्च क्षमतेची छायाचित्र, डाटा मिळवण्यासाठी कार्टोसॅट मालिकेतील सहाव्या उपग्रहाची आवश्यकता होती. भारताला ठराविक डाटासाठी दुस-यांवर अवलंबून रहावे लागत होते. त्यासाठी सहावा उपग्रह आवश्यक होता.
- कार्टोसॅट मालिकेतील उपग्रह अशा पद्धतीने बनवण्यात आले आहेत की, महत्वाच्या प्रसंगी एखाद्या ठराविक भागाचे छायाचित्र तुम्हाला मिळू शकते.
- पीएसएलव्ही सी 38 चे उड्डाण ही इस्त्रोची 90 वी मोहिम होती.
- 30 नॅनो उपग्रहांमध्ये 29 परेदशी आणि एक भारतीय उपग्रह आहे.
- ऑस्ट्रीया, बेल्जियम, ब्रिटन, चिली, झेक प्रजासत्ताक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, लाटविया, लिथुनिया, स्लोवाकिया आणि अमेरिका या 14 देशांचे 29 नॅनो उपग्रह आहेत.