शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- सर्जिकल स्ट्राइक्सवरून, काँग्रेस आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात काँग्रेसने आक्रमक राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितले आहे की, मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपवर चारही दिशांनी हल्ला करा आणि सर्जिकल आॅपरेशनचे नायकत्व मोदींना देण्याचा डाव हाणून पाडा. मोदींना श्रेय देताना भाजप प्रत्यक्षात जवानांच्या हौतात्म्याला दुय्यम लेखत असल्याचे लोकांना पटवून सांगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रसारमाध्यमातील मोठा भाग आपल्यासोबत नसून, तो आपल्या नेत्यांची विधाने चुकीचे संदर्भ देऊन सादर करीत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे कार्यालयदेखील सक्रिय झाले आहे. त्याचे पहिले दर्शन राहुल यांचे टिष्ट्ववमुळे झाले. त्यात राहुल यांनी ते जे गुरुवारी बोलले होते, तेच भाषा बदलून सांगितले. प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनीही काँग्रेसने भारतीय सैन्याला सर्वोच्च सन्मान दिला आहे व देईलही. परंतु सैन्याने केलेल्या पराक्रमाचा वापर भाजप राजकीय लाभासाठी करीत असून आम्ही तो होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.पंजाब व उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्जिकल आॅपरेशनच्या नावाखाली मोदी यांना नायकत्व बहाल करण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे. उत्तर प्रदेशमध्ये ते सुरूच आहे. सर्जिकल स्ट्राइक्स करण्यात मोदी यांनी दाखविलेले धाडस आणि ५६ इंचांची छाती यांचा संबंध जोडणारी पोस्टर्स भाजपाने तिथे लावली आहे. काँग्रेसने अशा काही पोस्टरांचे व्हिडिओ जारी केले व ते पुढेही सुरूच ठेवायचे ठरविले आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांची अधिसूचना जारी केल्यास या पोस्टरांचा आधार घेऊन त्याच्याकडे तक्रार करता येईल अशीही तयारी काँग्रेसने केलेली आहे. >राहुल गांधी जे काही म्हणाले त्यासोबत पक्ष कायम आहे व आम्ही तेदेखील सिद्ध करून दाखवू. ते विधान मागे घेऊन त्याबद्दल खेद व्यक्त करण्याचा तर प्रश्नच उद््भवत नाही कारण ते जे काही म्हणाले ते सत्य आहे, असेही सूरजेवाला म्हणाले.