ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 7 - एखाद्या जनावराला भूक लागल्यास त्याच्या खाण्यावर होणारा खर्च कधीतरी आर्थिक नुकसान करणारा ठरु शकतो. पण आपल्या भुकेलेल्या बकरीमुळे एका व्यक्तीला अक्षरक्ष: हजारो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे. या बकरीला इतकी भूक लागली होती की तिने मालकाच्या पँटमधील नोटांचं बंडल बाहेर काढलं, आणि चरण्यास सुरुवात केली. बरं हे काही 100 किंवा 1000 रुपये नव्हते. बकरीने 66 हजार रुपये गिळून टाकले. किन्नोज गावात ही अनोखी घटना घडली आहे.
शेतकरी असलेल्या सर्व्हेश कुमार यांनी आपल्या खिशात 66 हजार रुपये ठेवले होते. यामध्ये सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या. सर्व्हेश कुमार यांच्या घराचं बांधकाम सुरु असून विटा खरेदी करण्यासाठी त्यांनी है पैसे जमा केले होते.
सर्व्हेश कुमार यांनी बकरी नोटा चरत असल्याचं दिसलं तेव्हा त्यांचा काही वेळ आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्काच होता. त्यांनी बकरीच्या दिशेने धाव घेत आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती फक्त दोनच नोटा उरल्या होत्या. बकरीने उरलेल्या 31 नोटा कधीच फस्त केल्या होत्या.
"मी आंघोळ करायला जात होतो म्हणून पैशांचं बंडल पँटच्या खिशात ठेवलं होतं. मग काय आधीपासूनच कागद खाण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बकरीला संधी मिळाली आणि तिने चरायला सुरुवात केली. माझ्यासाठी ती मुलीप्रमाणे असल्याने मी जास्त काही करु शकत नव्हतो", असं सर्व्हेश कुमार यांनी सांगितलं आहे.
बकरीने नोटा खाल्ल्याची माहिती मिळताच आजूबाजुच्या परिसरातील लोकांनी बकरीला पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. अनेकांना हे प्रकरण मजेशीर वाटत होतं. अनेकांनी तिच्यासोबत फोटोही काढून घेतले.