- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - फक्त एक वर्षाचा असताना अपहरण झालेला शाहब तब्बल नऊ वर्षानंतर आपल्या घरी परतला आहे. आपल्या वाढदिवशी आई-वडिलांपेक्षा मोठं गिफ्ट त्याला काय मिळू शकत होतं. नऊ वर्षापूर्वी बालदिनाच्या दिवशी जेव्हा त्याचं अपहरण झालं तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. एका दांपत्याने शाहबचं अपहरण केलं होतं, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.
घटना 14 नोव्हेंबर 2007 ची आहे. 45 वर्षीय फरीदा लस टोचण्यासाठी बाबू जगजीवन राम रुग्णालयात गेल्या होत्या. शाहब तेव्हा फक्त एक वर्षाचा होता. फरीदा यांना तेव्हा तिसरा महिनादेखील चालू होता. 'माझ्या मुलाला बेंचवर बसवून अपॉईंटमेंट स्लीप घेण्यासाठी मी रांगेत उभी राहिले होते. त्यावेळी आपल्या मैत्रीणीशी गप्पा मारत असताना फक्त 10 सेकंदासाठी माझं शाहबकडे दुर्लक्ष झालं, आणि त्या 10 सेकंदांनी आमचं आयुष्यच बदललं', अशी आठवण फरीदा सांगतात.
आपला मुलगा हरवला आहे लक्षात येताच फरीदा आणि रुग्णालयतील कर्मचा-यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पण तो सापडला नाही. कृष्णानगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारदेखील करण्यात आली होती. पोलिसांनी खूप प्रयत्न केला, मात्र काहीच तपास न लागल्याने 2009मध्ये केस बंद करण्यात आली. 'फरीदा आणि मी रोज दिवसातील चार तास मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असे. मी नेहमी त्याचा फोटो माझ्या पाकिटात ठेवत असे, कोणास माहित देव कधी तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल', असं शाहबचे वडिल अफसर म्हणाले आहेत.
एका लग्नात गेले असताना काही नातेवाईकांशी मुलाच्या अपहरणाबद्दल बोलत असताना त्यांनी शाहबचा फोटो दाखवला. त्यातील एका व्यक्तीने असाच दिसणारा एक मुलगा आमच्या शेजारी राहत असल्याचं सांगितलं. त्यानंतर फरीदा आणि अफसर यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आसपासच्या शाळांमध्ये तपास सुरु केला, तेव्हा एका शाळेत त्यांना शाहब दिसला ज्याच्या चेह-यात साम्य होतं.
पोलिसांनी दोन दिवस शाहबवर नजर ठेवली आणि त्याच्या घरचा पत्ता मिळवला. शाहबचे खोटे आई-वडिल नर्गिस आणि मोहम्मद शमीम यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता आपण या मुलाला दत्तक घेतल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कोणतीही कागदपत्रे ते सादर करु शकले नाही. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रिया टाळण्यासाठीच आपण शाहबचं अपहरण केल्याचं अखेर त्यांनी कबूल केलं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.