आश्चर्य...हेल्मेट न घातल्याचा कार चालकाला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:49 PM2019-04-30T18:49:01+5:302019-04-30T18:50:28+5:30
गोपा कुमार असे या चालकाचे नाव असून ते नेक्सॉन या कारमधून जात होते.
वाहतुकीचे नियम मोडल्याने चलन भरावे लागते ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. मात्र, विना हॅल्मेट कार चालविल्यामुळे चलन भरावे लागल्याचे कधी ऐकिवात नसेल. केरळमध्ये हा प्रकार घडला आहे. कार चालविणाऱ्या चालकाला थांबवून त्याच्याकडून 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या चलनावर 'नो हॅल्मेट' असे लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे केरळ 100 टक्के साक्षर राज्य आहे.
गोपा कुमार असे या चालकाचे नाव असून ते नेक्सॉन या कारमधून जात होते. यावेळी त्यांना वाहतूक पोलिसांनी थांबविले आणि 100 रुपयांची पावती फाडली. या पावतीवर दंड 100 रुपये आणि त्याचे कारण लिहिले आहे. गोपी कुमार यांनी याबाबतचे फोटो फेसबुकवर टाकले आहेत. मात्र त्यांनी यामध्ये त्यांना कोणत्या कारणासाठी अडविण्यात आल्याचे सांगितलेले नाही.
पोलिसांनी चलनावर 'नो हेल्मेट' असे लिहिले आहे. गोपा कुमार यांनी याचा फोटो फेसबुकवर टाकला आहे. ही घटना केरळच्या सस्थमकोट्टा येथील आहे. चावारा रोडवर पोलिसांनी कुमार यांच्या कारला थांबविले होते.
हा प्रकार पोलिसांची चुकी की ते एकावेळी अनेकांना थांबवितात यामुळे झालेला गोंधळ हे समोर आलेले नाही. कारण पोलिस एकावेळी अनेकांना थांबवितात आणि पावत्या देतात. यामुळे चुकुन गोपी यांना दुचाकीस्वार समजून कारवाई केली गेली असेल, अशी शक्यता आहे.
काही काळापूर्वी गोव्यातही असाच एक प्रकार समोर आला होता. रॉयल एनफिल्ड चालविणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवून त्याला सीटबेल्ट न बांधल्याचे कारण दाखवत दंड आकारण्यात आला होता.