लखनौ: देशात एकीकडे कोरोनाची धास्ती पसरलेली असताना कानाकोपऱ्यातून काही दिलासा देणाऱ्या बातम्या येत आहेत. आज कोरोनामुळे देशात दोघांचा मृत्यू झाला. मुंबईत दुसरा आणि बिहारमध्ये पहिला कोरोनाचा बळी गेल्याने देशातील मृत्यूंची संख्या ६ वर पोहोचली आहे. अशातच आज कॅनडावरून भारतात आलेली महिला डॉक्टर कोरोनापासून बरी झाली आहे.
या महिला डॉक्टरला लखनौच्या केजीएमयूमधून घरी सोडण्यात आले आहे. तरीही तिला १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे या महिला डॉक्टरला कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक औषध देण्यात आलेले नाही. नाही कोणती परदेशातली महागडी औषधे, इंजेक्शने. त्यांना केवळ चार दिवस स्वाईन फ्लूवर दिली जाणारी टॅमी फ्लू सकाळी आणि संध्याकाळी एकेक अशी देण्यात आली. एवढ्या गोळ्यांतच ही डॉक्टर बरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
केजीएमयूमध्ये महिलेवर उपचार करणाऱे डॉक्टर सुधीर वर्मा यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसही एक प्रकारचा फ्लूच आहे. केवळ त्याचा प्रभाव जास्त आहे. साध्या फ्लूमध्ये आपली रोग प्रतिकारशक्तीच पुरेशी असते. अशीच शक्ती कोरोनाशी लढण्यासाठी पुरेसी आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरुण असाल तर घाबरण्याची गरज नाही. मात्र, सावध रहावे लागेल. वरिष्ठ नागरिकांची थोडी काळजी घ्यावी लागेल.
टॅमी फ्लूमुळे केवळ महिला डॉक्टरच नाही तर तिच्यासोबत उपचार घेत असलेल्या अन्य ७ रुग्णांनाही हेच उपचार देण्यात येत आहेत. त्यांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. यामध्ये महिलेचा चुलत भाऊही आहे. तसेच २८ वर्षीय निवासी डॉक्टरचीही प्रकृती ठीक आहे. शुक्रवारी तिघांना भरती करण्यात आले होते.
डॉक्टर महिला बरे झाल्याचा घटनाक्रम
11 मार्च रोजी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि तिला विलगीकरण कक्षात दाखल केले. दुसर्या दिवशी त्या महिला डॉक्टरचा लॅपटॉप-मोबाईल वगैरे स्वच्छ करण्यात आला.
16 मार्च पर्यंत निरिक्षणाखाली ठेवले. कोणतेही औषध दिले नाही.
17 मार्च रोजी महिलेला हलका ताप आला. यानंतर, डॉक्टरांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वाईन फ्लूची गोळी टॅमी फ्लू टॅब्लेट देणे सुरू केले. याशिवाय दुसरे कोणतेच औषध दिले नाही.
20 मार्च पर्यंत महिलेला टॅमी फ्लू देण्यात आले होते. त्याच दिवशी, तिची चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्हा चाचणी घेण्यात आली.
21 मार्च: दुसरा अहवालही निगेटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेला डिस्चार्ज केले.