ऑनलाइन लोकमत
तिरुवन्नमलाई, दि. 18 - एकाच कुटुंबातील सदस्यांचा लागोपाठ होत असलेले मृत्यू सध्या थंदराई शहरात चर्चेचा विषय बनला आहे. अशाप्रकारे एकामागोमाग एकाचा मृत्यू होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामागचं गूढ काय आहे याची उत्सुकताही लागून आहे. या सर्वाची सुरुवात झाली ती 13 वर्षीय क्रिस्टफरच्या मृत्यूने. 7 ऑक्टोबर 2016 रोजी क्रिस्टफरचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 वर्षीय सारनचा मृत्यू झाला आणि गुढ अजून वाढलं.
सारनवर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तिरुवन्नमलाई वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. "आजारी असल्याने तीन दिवसांपुर्वी त्याला दाखल करण्यात आलं होतं. रविवारी सकाळपर्यंत त्याची तब्बेत स्थिर होती. मात्र अचानक त्याची तब्बेत बिघडली आणि उलट्या होऊ लागल्या. तीन वाजण्याच्या आसपास त्याचा मृत्यू झाला", अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत वडनेरे यांनी दिली आहे.
जरा हटके बातम्या
डेंग्यूमुळे मुलाचा मृत्यू झाला असेल ही शक्यता जिल्हाधिका-यांनी फेटाळून लावली आहे. त्याला अन्नातून विषबाधा किंवा दुसरा गंभीर आजार झाला असल्याची शक्यता जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून तो आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण कळू शकणार आहे.
7 ऑक्टोबर रोजी क्रिस्टफरच्या मृत्यूनंतर एकाच महिन्यात कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचा मृत्यू झाला होता. निधन झालेल्या कुटुंबियांची नावे विनोद कुमार (23), नेल्सन (11), क्रितिका मेर्लिन (7), नेल्सनचे आजोबा जोसेफ (70) आणि मेर्लिनची आजी ख्रिस्ता (65) अशी आहेत. या सर्वांनाही मृत्यू होण्याआधी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवला होता.
ख्रिस्ता (65) यांचा 31 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. ख्रिस्ता यांच्या पोस्टमॉर्टममधून विषबाधा झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं अशी माहिती जिल्हाधिकारी वडनेरे यांनी दिली आहे. "ख्रिस्ता यांच्या किडनी, यकृत आणि रक्ताच्या नमुन्यात पिवळा फॉस्फरस आढळला होता", अशी माहिती वडनेरे यांनी दिली आहे.
यानंतर हे प्रकरण तपासासाठी पोलिसांकडे सोपवण्यात आलं. मात्र पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता. पीडितांच्या नातेवाईकांकडून कोणत्याच प्रकारचं सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी तपास बंद केला होता.