बहादुरगड : भारतात सध्या लोकशाहीचा महायज्ञ सुरु आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एखादा हिरो- हिरोईन आणण्याचा प्रघात सगळीकडेच आहे. पण एक नाही, दोन नाही तब्बल 30 देशांच्या सुंदऱ्या जर मतदान जागृतीसाठी आल्या तर... होय आपल्याच देशात हे घडले आहे. या सुंदऱ्यांनी उन्हाच्या कडाक्यात बहादुरगडच्या रस्त्यांवर Vote For India चे नारे दिले.
महत्वाचे म्हणजे या सुंदऱ्या एवढ्या मोठ्या संख्येने काही निवडणुकीसाठी आल्या नव्हत्या. तर त्या दिल्लीमध्ये होणाऱ्या मिस सुपरमॉडेल वर्ल्डवाईड ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी आल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजक संदीप हे बहादुरगडचे आहेत आणि दिल्ली बहादुरगडला लागूनच आहे. यामुळे संदीप यांनी विचार केला की, मतदान जागृतीसाठी का नाही या सुंदऱ्यांकडून आवाहन केले जावे. बस्...या विचारातून त्यांनी या सुंदऱ्यांना बहादुरगडच्या रस्त्यांवर आणले आणि त्यांना पाहण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनींसह नागरिकांची ही झुंबड उडाली.