देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, त्यामुळे कोरोना नियमावलीचे कडक पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे पोलीस यंत्रणाही कामाला लागल्याचं पहायला मिळतंय. विनामास्क, विनाहेल्मेट फिरणाऱ्यांवर पोलिसांनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ओडिशातील पोलिसांनी हेल्मेट न घातल्यामुळे चक्क एका ट्रक ड्रायव्हरकडून 1 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो आणि दंडाची पावती व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. त्याच पार्श्वभूमीवर विविध राज्यात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झाल असून पोलीसही तैनात आहेत. पोलिसांकडून विमा मास्क आणि कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ओडिशातील एका ट्रक ड्रायव्हरवर केलेल्या कारवाई सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत, तर अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
“मी गेल्या तीन वर्षांपासून ट्रक चालवित असून पाणीपुरवठ्यासाठी हा ट्रक वापरण्यात येतो. माझ्या ट्रकच्या परवान्याची मुदत संपल्यामुळे मी नूतनीकरणासाठी आरटीओकडे गेलो. त्यावेळी, कोणीतरी हेल्मेट न घालता माझा ट्रक चालवत होता, त्यामुळे दंडाची रक्कम प्रलंबित ठेवण्यात आल्याचे समजल्याचे स्वेम यांनी सांगितले. तसेच, आरटीओ कार्यालयाकडून नाहक त्रास देऊन नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचंही स्वेम यांनी म्हटलं.