नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी देशातील वाढत्या महागाईवर भाष्य केलं होतं. त्यानंतर, आज लोकसभेत बोलताना सुळे यांनी सध्या गाजत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या मुद्द्याला हात घातला. काश्मिरी पंडितांबद्दल सरकारकडून संवेदना आणि सहानुभूतीची भावना व्यक्त होत आहे. त्यावरुनच, सुप्रिया यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. गेल्या 7 वर्षांच्या कालावधीत आपण काश्मिरी पंडितांच्या भल्यासाठी काय केलं? असा सवालच सुप्रिया सुळेंनी लोकसभेत विचारला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली. पहिल्या सरकारने 60 वर्षात काय केलं, हा डायलॉग आता जुना झालाय. केवळ आर्टीकल 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यात बदल घडत नाही. काश्मीरच्या महिला आणि मुलांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी काश्मीरमध्ये गंतवणुकीची गरज आहे, हे सत्य कोणीही नाकारत नाही. मात्र, जम्मू काश्मीरच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरदूत केली? असा सवालच सुप्रिया सुळेंनी लोकसभेत चर्चेदरम्यान उपस्थित केला.
सात वर्षे हा मोठा काळ आहे, या कालावधीत सरकार म्हणून आपण काहीतरी करू शकला असतात. कुपोषित मुलांचे उदाहरण देत सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, एखादी आई त्या मुलाला खाऊ घालून, चालतं-फिरतं करत शाळेत पाठवते. म्हणजेच, 7 वर्षात खूपकाही करता आलं असतं, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने काश्मिरी लोकांना हजारो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबद्दल काहीही झाले नाही. भाजपाच्या सदस्यांनी केंद्रशासित प्रदेशात जाऊन वास्तविकता जाणून घ्यावी, असेही त्या म्हणाल्या. जम्मू आणि काश्मीरमधील जीडीपी आणि कर्जाचं प्रमाण चिंताजनक असून स्मार्ट सिटी हा अयशस्वी प्रकल्प असल्याची टीकाही सुळे यांनी केली.