ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार व्ही. के. शशिकला यांची आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तुम्हाला तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून, या आदेशात कोणताही बदल केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दिलेल्या आदेशातील एकही शब्द बदलण्याचा आमचा विचार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांची तुरुंगवारी अटळ केली आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना ६0 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा आणि दहा कोटी रुपये दंड सुनावला असून आत्मसर्पण करण्याचा आदेश दिला आहे. शशिकला दोषी ठरल्याने मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शशिकला मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. पुढील सहा वर्ष शशिकलांना निवडणूक लढवता येणार नाही, तर पुढील दहा वर्ष त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होता येणार नाही. शशिकला निर्दोष ठरल्या असत्या तर शपथविधीसाठी राज्यपालांनी त्यांना पाचारण करण्याची शक्यता होती.
मात्र अटक होण्याआधी ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात शशिकला यशस्वी ठरल्या असून, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण असेल?, पनीरसेल्वम की पलानीसामी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात कायदेतज्ज्ञ व घटनातज्ज्ञ यांचा सल्ला घेतला आहे. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची कोंडी करण्यासाठी त्यांची व १८ नेत्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. मात्र शशिकला यांना तो अधिकारच नाही आणि पलानीस्वामी यांची निवडही बेकायदा आहे, असे पनीरसेल्वम सांगत आहेत.
#VKSasikala mentions before Supreme Court seeking more time to surrender, but SC refuses to give more time— ANI (@ANI_news) February 15, 2017
जयललितांनी निलंबित केलेल्या पुतण्यांची शशिकलांकडून घरवापसी
जयललिता यांनी पक्षातून निलंबित केलेल्या पुतण्यांना शशिकला यांनी पुन्हा पक्षात प्रवेश दिला असून पक्षाची सुत्रे आपल्याच हाती राहतील याची पुर्ण खबरदारी घेतली आहे. शशिकला यांनी दिनकरन आणि व्यंकटेश ज्यांना 2011 मध्ये जयललितां यांनी पक्षातून निलंबित केलं होतं त्यांची शशिकला यांनी घरवापसी केली असून उप सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.