काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या तीन युद्धांचा उल्लेख केला. या युद्धांमुळेच पाकिस्तानात आज गरीबी आणि बेरोजगारी असल्याचे ते म्हणाले. तिन्ही युद्धांत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. त्यापैकीच एक युद्ध होते, बांग्लादेश मुक्तीसंग्राम. या युद्धाच्या सरेंडरच्या वेळची एक महत्वाची घडामोड आता समोर आली आहे.
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली होती. त्या शरणागतीच्या मसुद्यावर सही करणारे पाकिस्तानचे जनरल नियाजी होते. नियाजी यांची सही होत नाही तोच, तिथे जमलेल्या जमावाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, नियाजी हे भारताची जबाबदारी होते. भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नियाजींचा जीव वाचविला होता. हा किस्सा लोकांच्या विस्मृतीतच गेला होता.
16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी लष्करातील लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडसमोर आत्मसमर्पण दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. जनरल नियाझी हे जमावाकडून मारले गेले असते, परंतु मेजर जनरल गंधर्व नागरा यांनी त्यांचे शिताफीने प्राण वाचविले.
परराष्ट्र मंत्रालयात तत्कालीन संयुक्त सचिव (पाकिस्तान डेस्क) असलेले एके रे हे एकमेव नागरी अधिकारी होते ज्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. युद्धादरम्यान मेजर जनरल जेकब हे भारताच्या पूर्व सैन्याचे कमांडर होते. मेजर जनरल गंधर्व नागरा देखील बांग्लादेशच्या विमानतळावर उपस्थित होते. यानंतर जनरल नियाझी येथे पोहोचले. जनरल नियाझी यांना रामना मैदानावर आणण्यात आले. या मैदानावर एक टेबल आणि काही खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. जनरल अरोरा यांनी या टेबलवर आत्मसमर्पण करण्याची कागदपत्रे ठेवली.
पाकिस्तानी लष्कराचे केवळ 300 सैनिक मैदानावर उपस्थित होते. परंतू सामान्य नागरीकही आले होते. नियाझी यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. टोपी आणि बेल्ट काढला आणि रडू लागले, त्यावेळी जमावातील लोकांनी त्यांना ओळखले. यामुळे संतप्त जमाव त्यांच्यादिशेने येऊ लागला. नियाझी युद्धबंदी होते, यामुळे त्यांना वाचविण्याची भारताची जबाबदारी होती.
नागरा यांनी प्रसंगावधान राखले आणि आपल्या सैनिकांचे कडे केले. बाजुलाच असलेल्या जीपमध्ये नियाझींनी बसवून गोळीच्या वेगाने ती जीप मैदानातून कॅन्टकडे निघाली आणि नियाझी वाचले.