कोलकाता : सुंदरबनच्या संरक्षित वनक्षेत्रातील वाघ आणि शिकारींच्या हालचालींवर आता ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल वन विभागाने एक ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्याची किंमत २० ते २५ लाख रुपये आहे.सुंदरबन बायोस्पिअर रिझर्व्हचे संचालक प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ड्रोनमुळे आमचे कर्मचारी एकाच ठिकाणी बसून १५ ते २० चौरस कि.मी. वन क्षेत्रावर नजर ठेवू शकतील. त्यामुळे आमची क्षमताही वाढेल. याशिवाय एखाद्या वाघाला उपचाराची गरज असेल अथवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडून त्याच्या जिवाला धोका असल्यास ड्रोन त्यांचा शोध घेण्यास मदत करील. संरक्षित क्षेत्रातील शिकाऱ्यांच्या हालचाली जाणून घेण्यास ते अत्यंत उपयोगी पडणार आहे. जंगलात पोहोचण्यास एका नावेची गरज असते. आणि ही नाव कुठे लावण्यात आली आहे हे बघण्याची ड्रोनची क्षमता आहे. एखाद्या व्यक्तीला घनदाट जंगलात लपणे शक्य आहे; परंतु नाव मात्र दिसेलच. त्यामुळे घुसखोर जंगलाच्या कुठल्या भागात घुसला आहे हे सहज कळू शकेल, असेही व्यास यांनी स्पष्ट केले. जीपीएस प्रणालीने सज्ज आणि उच्च क्षमतेचा कॅमेरा असलेले ड्रोन आता वन्यजीव व्यवस्थापनासाठी फार महत्त्वाचे झाले आहे. (वृत्तसंस्था)
सुंदरबनवर ड्रोन ठेवणार पाळत
By admin | Published: August 26, 2015 3:42 AM