- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला घवघवीत यश मिळू शकते, असा अंदाज काँग्रेसने एका खाजगी संस्थेच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणातील अंदाजानुसार, मिझोराम आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार नाही. तथापि, या राज्यांत सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचा उदय होईल. ९१ जागा असलेल्या छत्तीसगढमध्ये काँग्रेसला ३५ ते ४0 जागा मिळतील. ४0 जागा असलेल्या मिझोराममध्ये काँग्रेसला १७ ते २0 जागा मिळतील.
सूत्रांनी सांगितले की, सर्वेक्षणातील अंदाजानुसार निकाल आल्यास छत्तीसगढमध्ये काँग्रेस अजित जोगी आणि मायावती यांच्याशी आघाडी करून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू शकते. कर्नाटकाच्या धर्तीवर जोगी यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून आपला स्वतंत्र पक्ष बनवलेला आहे.
सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. राजस्थानात काँग्रेसला १३५ जागा मिळू शकतात. मध्यप्रदेशात १२५ आणि तेलंगणात ६५ ते ७0 जागा मिळू शकतात. या तिन्ही राज्यांत काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करील.
लक्षणीय बाब म्हणजे या अहवालात भाजपाला किती जागा मिळतील, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, या राज्यांत भाजपाच्या हातून सत्ता निसटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अहवालानुसार, तेलंगणात सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) जबरदस्त झटका बसण्याची शक्यता आहे. टीआरएसने एमआयएमसोबत युती केलेली आहे. काँग्रेसने तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) यांच्यासोबत आघाडी केलेली आहे.